
४४ वी फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपियाड स्पर्धेसाठी रत्नागिरीचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी यांची पंच म्हणून निवड
४४ वी फिडे वर्ल्ड चेस ऑलिंपियाड स्पर्धा २९ जुलैपासून महाबलीपूरम (चेन्नई) येथे सुरू झाली. त्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनी यांची पंच म्हणून निवड झाली. भारतात ही स्पर्धा प्रथमच होत असून, १८४ देशांतील दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच अशी नियुक्ती झाली असून, रत्नागिरीच्या शिरपेचात दुसऱ्यांदा मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलले असून तामिळनाडू सरकारच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. जगज्जेता मॅग्नस कार्लसन, अनिष गिरी, विदित गुजराथी, लिओन आरोनिअन, सॅम शंखलंड, मुझिचुक भगिनी, कोनेरू हम्पी यांच्यासारख्या १७५० हून अधिक नावाजलेल्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याची संधी विवेकला मिळाली आहे.
विवेक सोहनी २०१६ मध्ये रत्नागिरीच्या चैतन्य भिडे व कोल्हापूरच्या भरत चौगुले यांच्या आग्रहाखातर या क्षेत्रात आले. त्यानंतर सर्व गोष्टी आपसूकच घडत गेल्या, अशी प्रांजळ कबुली विवेक यांनी दिली. तसेच या दोघांचेही विशेष आभार मानत गेल्या ६ वर्षाच्या कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यात दिल्लीच्या गोपाकुमार, चेन्नईच्या आनंद बाबू, बंगलोरच्या वसंथ बी. एच. आणि बिहारच्या धर्मेंद्र कुमार यांच्या मार्गदर्शनाचा कुटुंबीयांच्या सहकार्याचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. बुद्धिबळाचे फारसे वातावरण नसणाऱ्या रत्नागिरीसारख्या भागातून येऊन जागतिक स्तरावर काम करणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील इतर १० पंचांसोबत विवेकच्या निवडीबद्दल महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, वरिष्ठ उपाध्यक्ष अभिजित कुंटे यांनी आनंद व्यक्त केला
www.konkantoday.com