भाजपा बळकट करण्यासाठी लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन : आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्गसह राज्यातील सोळा लोकसभा मतदारसंघात विकासात्मक आणि संघटनात्मक स्थिती मजबुतीसाठी भाजपने लोकसभा प्रवास योजनेचे आयोजन केले आहे. रत्नागिरीत 7 ऑगस्टला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली तीन दिवसांच्या दौर्यावर येत असून मतदारसंघातील सर्व घटकांचा आणि विकासात्मक कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री, भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपने ‘अब की बार चारशे पार’च्या दृष्टीने आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे. भाजपच्या ‘लोकसभा प्रवास योजने’ची माहिती व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यासाठी रत्नागिरीत आलेल्या आ. बावनकुळे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार व भाजपा प्रदेश सचिव नीलेश राणे, माजी आ.प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, माजी. आ. राजन तेली, माजी. आ. बाळ माने, अतुल काळसेकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पाटील उपस्थित होते.
आ. बावनकुळे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने चारशेपारचे लक्ष्य ठेवून आहे. त्यासाठी राज्यातील सोळा मतदारसंघात प्रत्येकी 18 महिने प्रवास योजना सुरू राहणार आहे. त्यासाठी सहा केंद्रीय मंत्री नेमण्यात आले असून ते प्रत्येकी तीन दिवस याप्रमाणे 18 दिवस मतदारसंघात मुक्काम करतील. त्यावेळी स्थानिक मतदार, कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासह शासकीय अधिकार्यांशी संवाद साधणार आहेत. मतदारसंघातील संघटनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्राशी निगडीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आठ वर्षांच्या कालावधीत झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत होईल. बूथ कार्यकर्ते, योजनांचे लाभार्थी, मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिक, शौर्य पुरस्कार विजेते यांची भेट घेतली जाणार
आहे.
भविष्यात एनडीए म्हणून निवडणूक लढवताना जागा वाटपात यातील काही जागा गेल्या तरीसुद्धा सहयोगी पक्षाच्या पाठीशी त्या ठिकाणी भाजपा भक्कमपणे उभा राहणार आहे. प्रवासी योजनेद्वारे स्थानिक प्रशासनाने केंद्रातील योजना मतदार संघात कशा पध्दतीने राबविल्या, त्याचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचला का ?याचा आढावा प्रशासकीय पातळीवर घेतला जाणार आहे. राजापुरातील प्रस्तावित रिफायनरीचा प्रश्नही याच प्रवास योजनेच्या निमित्ताने सोडवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.