कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्याला अटक
खेड ः कोकण रेल्वे मार्गावरून दि. 29 जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या एक्सप्रेस या गाडीतून प्रवाशाचा किमती मोबाईल चोरल्याप्रकरणी खेडमधील तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश एकनाथ मस्तेकर (वय-30,रा.केळवली -इंगळेवाडी, ता.राजापूर,जि.रत्नागिरी) हा दि.29 रोजी कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करीत होता. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चिपळूण रेल्वेस्थानकाच्या अलिकडे गाडी आली असता संशयित आरोपी रमेश सदानंद भिलारे (वय-28, रा. चाकाळे -शिवाजीनगर,खेड) याने दिनेश यांच्या बाजूला ठेवलेला वीस हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याचे दिनेश मस्तेकर यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने रमेश भिलारे यांच्या विरोधात चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलिस करीत आहेत.