
रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलला पोषण आहारात दिला कच्चा भात; भातात आढळले केस
रत्नागिरी : नव्या शैक्षणिक वर्षापासून शालेय पोषण आहाराचे वाटप बचत गटाकडून काढून घेण्यात आले. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून परजिल्ह्यातील तीन संस्थांना शालेय पोषण आहार वाटपाचा ठेका देण्यात आला. रत्नागिरी पालिका व पालिकेचे शिक्षण मंडळ यांच्यामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात आली. सोमवार 1 ऑगस्टपासून नव्या संस्थांमार्फत शालेय पोषण पुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी शहरातील रा.भा.शिर्के प्रशालेत शालेय पोषण आहार पुरवठा करणार्या संस्कार महिला मंडळ कोल्हापूर या संस्थेने चक्क कच्चा भात विद्यार्थ्यांना वाढला. तर विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या भातात केसही आढळले आहेत. विद्यार्थ्यांनी हा भात फेकून दिला. एकाच वेळी शंभरहून अनेक विद्यार्थ्यांनी पोषण आहार खायला सुरुवात केल्यानंतर त्यांना भात कच्चा असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ यांची माहिती मुख्याध्यापकांना दिली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पोषण आहाराचे वाटप तत्काळ थांबविण्याची सूचना केली. शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटपासाठी नव्याने नियुक्त केलेल्या संस्थेने रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांना चक्क कच्च्या भाताचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सेंट्रल किचनच्या माध्यमातून प्रशासनाला नेमके काय साधायचे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाल्यानंतर पालिकेच्या शिक्षण मंडळाला खडबडून जाग आली आणि त्यांनी दुसर्या संस्थांकडून पोषण आहार आणून विद्यार्थ्यांना दिला. नव्याने नेमलेल्या संस्थेने कच्चा भात पुरवल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी तत्काळ शाळेला भेट देऊन दुसर्या संस्थेकडून पोषण आहार मागविला. त्यानंतर पुन्हा आहाराचे वाटप सुरु झाले. मात्र मुलांना तब्बल तासभर आहाराशिवायच राहावे लागले. त्यामुळे विद्यार्थी भूकेने व्याकूळ झाले होते. संस्थांना ठेका देताना पोषण आहाराची ताटे संस्थेने आपल्या कर्मचार्यांमार्फत स्वच्छ करण्याची अट असताना शिर्के प्रशालेत पोषण आहार देणार्या संस्थेने विद्यार्थ्यांनाच त्यांची ताटे स्वच्छ करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारची दखल शिक्षण मंडळाने घेतली आहे.