जुळ्या मुलांना जन्मत:च डोळ्यांच्या समस्येने ग्रासले…जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांमुळे मुलीलाही जग दिसले…
जिल्हा शासकीय रुग्णालयात एका मातेला मुलगा आणि मुलगी अशी दोन जुळी मुले झाली. जन्मत:च या दोघांच्या डोळ्यांना मोठी समस्या असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. जर वेळीच उपचार केले नाही तर अंधत्व येणार होते. तत्काळ निर्णय घेत संबंधित पालकांनी मुलाला कोल्हापूरला नेऊन इंजेक्शन दिले. पण, मुलीला इंजेक्शन देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगितले. ही बाब जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना समजताच त्यांनी तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आणि या घटनेतील चिमुकलीला जीवदान दिले. या घटनेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड आणि डॉ. संघमित्रा फुले यांनी या चिमुकलीला उपचार मिळेपर्यंत सहकार्य केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ही वेळ पालकांवर आली. परंतु जिल्हा प्रशासनातील काही अधिकार्यांसह जिल्ह्यातील एक उद्योजक या बालकांसाठी धावून आले.
नवजात बालकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन सिव्हिलमध्येच करण्यात येणार होते. मात्र, यासाठी जे इंजेक्शन लागणार होते ते त्या एकासाठी 40 हजार रुपये आवश्यक होते. इंजेक्शन काही ठराविक आय हॉस्पिटलमध्येच उपलब्ध असल्याने पालकांनी मुलाला कोल्हापूरला नेले तर मुलीला नेले नाही. मुलाला इंजेक्शन देऊन आणण्यात आल्यानंतर मुलीला इंजेक्शन देणार कोण? असा प्रश्न होता. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ही बाब जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारली. याचवेळी खेड तालुक्यातील प्रशांत पटवर्धन हे जिल्हाधिकारी कार्यालयात वैयक्ति कामासाठी आले असता त्यांनी या चिमुकलीच्या इंजेक्शनच्या खर्चासाठी आर्थिक मदत केली. हे इंजेक्शन त्वरित घेण्यात आले. प्रशासनातील हे 3 अधिकारी आणि प्रशांत पटवर्धन यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे चिमुकलीला नवसंजीवनी मिळाली आहे.