खा. संजय राऊत यांना कर नाही मग डर कशाला? : माजी मंत्री व भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
रत्नागिरी : ईडीकडून झालेली कारवाई एकाच रात्री झालेली नाही. तुमच्या बँक खात्यामध्ये थेट करोडो रुपये येत असतील आणि त्या संदर्भात तक्रारी होत असतील तर त्याची चौकशी होणारच. तुम्ही जर पैसे घेतले नसाल तर न्यायालयामध्ये ते सिद्ध होऊ शकते, ज्याला कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल माजी मंत्री व भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी खा. संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर केला आहे. नवीन सरकारने या प्रकरणाच्या चौकशा सुरू केल्या तर त्यात गैर काय? असा प्रश्नही आ. बावनकुळे यांनी उपस्थित केला. खा. राऊत यांच्यावर ईडीने केलेली कारवाई ही एका रात्री झालेली नाही. त्यांच्या विरोधात भाजपाने तक्रार केलेली नाही. सहाशे मराठी माणसांची घरे घशात घालणार्या राऊत यांच्यावरील आरोपांची चार्टशीट बाहेर येईल, त्यावेळी सगळे चित्र स्पष्ट होईल. म्हाडानेही याप्रकरणात एफएसआयबाबत तक्रार केली आहे, असे आ. बावनकुळे यावेळी म्हणाले.