रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या 1 हजार 421 ने वाढली
रत्नागिरी : यावर्षी जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. जि.प.च्या शाळांची 1 हजार 421 ने पटसंख्या वाढली आहे. गुणवत्तेत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरी जि.प.च्या शाळा पुढे आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटासाठी गेल्या दिड दोन वर्षात विशेष नियोजन केले जात आहे. कोविड -19 च्या कालावधीत ही इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांनी, विद्यार्थ्याांसाठी अनेक अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करुन दिलेच आणि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नव्हती तेथे शिक्षकांनी स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेने इयत्ता 1 ली ते 8 वी साठी स्वत:च्या स्वाध्याय पुस्तिका कमी कालावधीत जिल्हाभर पोहोच केल्या. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळांचा पट हा वाढत आहे. शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा व अन्य सोई सवलतीमुळे मुलांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढत आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट टिकविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. पहिल पाऊल, शाळा पूर्व तयारी मेळावे, स्वाध्याय उपक्रम, गणवेश, पाठयपुस्तक असे उपक्रम परिणामकारकपणे राबविले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा चांगला निकाल, सेमी इंग्रजी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे सुजाण पालकांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये ओढा वाढत चालला आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी विशेष लक्ष घातले होते. या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून यावर्षी म्हणजे 2022 चा नवोदयचा निकाल खूप कमी काही सांगून जातो. एकूण 80 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी फक्त जिल्हा परिषद शाळांचेच निवडले गेलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांना यामुळे अच्छे दिन आल्याचे संकेत या माध्यमातून मिळत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हयामध्ये दिनांक 05 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागात मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. यापूर्वी शाळाबाह्य स्थलांतरित व अनियमित मुलांचा शोध घेण्यासाठी मार्च 2022 मध्ये विशेष शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यावेळी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. सद्यस्थितीत शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्याने दिनांक 23 जुन 2022 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्हयामध्ये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये 3 ते 18 वयोगटातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. दिनांक 5 ते 20 जुलै 2022 च्या कालावधीत झालेल्या सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हयामध्ये 4 मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना नजिकच्या शाळेत दाखल करण्यात आले.