शासनाच्या योजना कागदोपत्री नको, तर तळागाळापर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांच्या सूचना
रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बालकल्याण, बालविकास संबंधित 9 विभागांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. यावेळी त्यांनी केवळ कागदपत्रीय अंमलबजावणी नको तर शासनाच्या विविध योजना आणि उपक्रमाची तळागाळापर्यंत काटेकोरपणे काम झाले पाहिजे. जे काम होईल ते परिपूर्ण झाले पाहिजे तरच दुर्बल, वंचित आणि पीडितांना योग्य न्याय मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा प्रशासनाचे महिला बालकल्याण, महिला बालविकास, समाजकल्याण या अंतर्गत 9 समित्या आहेत. या समित्यांचे काम कशा पध्दतीने सुरु आहे त्याचा आढावा, मंजुरी देणे या बाबी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक समितीने आपल्या कामाचा आढावा सादर केला.
यावेळी प्रत्येक समितीची सखोल माहिती घेऊन योग्य त्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केल्या. कायद्याचे पालन न झाल्यास संबंधित व्यक्तीला कायदेशीर कारवाईसुध्दा झाली पाहिजे. त्यामुळे समित्यांनी जिल्हा पोलीस दलाशी संवाद ठेवणे आवश्यक आहे विशेषत: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सुरक्षा कक्षाशी संपर्क ठेवून सल्ला घेणे गरजेचे आहे. दर महिन्याला समित्यांनी आढावा बैठक कार्यालयाच्या ठिकाणी घेवून कामकाज पाहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. बालसुरक्षा, वनस्टॉप सेंटर या शिवाय अन्य समित्यांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अशासकीय सदस्य बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक विभागाने आपल्या कामाचा आढावा चित्रफितव्दारे सादर केले. काही समित्यांचे कामांचे कौतुकही जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी केले.