रघुवीर घाटात दरड कोसळली, वाहतुक ठप्प महिन्यातील दुसरी घटना – आकल्पे खेड एस.टी.बस अडकली
खेड, ता.30 ः रत्नागिरी व सातारा जिल्हा जोडणार्या रघुवीर घाटात मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे रघुवीर घाटाच्या पलीकडच्या कांदाटी खोर्यातील 21 गावांचा संपर्क तुटला असुन, आज सकाळी या संदर्भांत माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जेसीबी सह अन्य सामुग्री घेऊन बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेले आहेत. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उप विभागाच्या उपअभियंता श्रीमती आशा जाटाळ यांनी दिली. मध्यरात्रीच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आकल्पे येथे वस्तीला असलेली आकल्पे – खेड ही एस.टी.बस पलीकडे अडकून पडली आहे. त्यामुळे आज कामानिमीत्त खेड शहरात येणार्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पे सह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यस्थितीत बंद झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रघुवीर घाटात ज्या ठिकाणी धोकादायक दरड किंवा अतिवळणे आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावरील रस्त्यालगत घळी निर्माण झाल्या आहेत. त्या ठिकाणी गेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षित करण्याचे काम गेले काही दिवस सुरू होते. मुसळधार पावसामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने हा घाट ता.1 जुलै पासूनच दोन महिन्यासाठी पर्यटकांसाठी बंदच ठेवण्यात आला आहे. पर्यटक जावू नयेत यासाठी या घाटाच्या पायथ्याशीच पोलिसांनी बॅरिकेटींग देखील केलेले आहे. त्यामुळे या दरडी मुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. ही कोसळलेली दरड मोकळी करण्यासाठी रघुवीर घाटात जेसीबी आणि बांधकाम चे कर्मचारी गेले असुन, कोसळलेली दरड ही मोठ्ठी असुन ही दरड काढून रस्ता मोकळा करण्यासाठी संध्याकाळ होईल अशी माहिती शिंदी -वळवण येथील ग्रामस्थ सदानंद मोरे यांनी दिली.