
फुरुस येथे मारहाणीत जखमी प्रौढाचा उपचारावेळी मृत्यू
खेड : तालुक्यातील फुरूस फणसवाड येथील मोहल्ल्यात दि.25 जून रोजी दुपारी 2 वाजता. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मैनुद्दीन सिद्दीकी (वय 49, फुरूस फणसवाड मोहल्ला) असे मयत प्रौढाचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन सिद्दीकी (वय 49, फुरूस फणसवाड मोहल्ला) याच्यावर दि.25 जून रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून सुलतान शौकत कुरेशी (वय 48), अमान कुरेशी (वय 19), नूरेन कुरेशी (वय 19), शबनम कुरेशी, फातीमा कुरेशी, अनम सुलतान कुरेशी (वय 38, सर्व रा. फुरूस फणसवाड, मोहल्ला) यांनी प्राणघातक हल्ला केला होता.
पाठीत चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी होते. शासकीय रूग्णालय रत्नागिरी येथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुैनद्दीन सिद्दीकी याच्या मृत्यूप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करून खेड न्यायालयासमोर हजर केले असता दोघांना न्यायालयीन कोठडी तर अन्य संशयितांची दि. 30 पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.