डाटा आँपरेटर सह तालुका समन्वयक म्हणून नोकरीला लावतो सांगून लाखो रुपयांची फसवणूक खेड पोलिसात गुन्हा दाखल – दोघांना घेतले ताब्यात
शासनाच्या ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत तालुकास्तरावर डाटा ऑपरेटर तसेच तालुका समन्वयक म्हणून नोकरीला लावतो असे सांगून अनेक महिलांची प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे पैसे घेऊन लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर संजीवनी संजय शेलार ( वय – ४२, रा. समर्थनगर – भरणे ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्या तिघाजणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र खेड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयतांनी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे.
शासनाच्या ई-गव्हर्नन्स या योजनेच्या अंतर्गत नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ देण्यासाठी तालुकास्तरावरती डाटा ऑपरेटर्स तसेच तालुका समन्वयक अशा प्रकारची विविध पदे भरायची असून आपण ही गव्हर्नर विभागाचा महाराष्ट्र हेड असल्याचे सांगून जिल्ह्यातील गरीब व गरजू महिलांना नोकरीचे अमिष दाखवून या सर्व महिलांकडून संजय पाटील या व्यक्तीने कौशल्य विकास नावाच्या एका खाजगी संस्थेच्या माध्यमातून दहा हजार रुपये प्रशिक्षणाच्या नावाखाली मागितले. त्यानंतर तालुकास्तरावर आपली डेटा ऑपरेटर म्हणून नियुक्ती केली जाईल असे आश्वासन देखील दिले.
एप्रिल महिन्यात खेडमधील २९ तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे १६२ महिलांकडून प्रत्येकी ३०००/- या प्रमाणे कौशल्य विकास या संस्थेच्या बँक खात्यात पैसे भरून घेतले. तसेच तालुकास्तरावर आपण लवकरच प्रशिक्षण घेऊन आपल्या नियुक्त्या केल्या जातील असे आश्वासन देखील संजय पाटील या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष त्यांच्यासोबत काम करणाऱ्या जिल्ह्यातील महिलांच्या माध्यमातून सर्वांना सांगितले. या गोष्टीला तीन महिने झाले तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच डाटा ऑपरेटर म्हणून नियुक्तीपत्र देखील दिले गेले नाही. म्हणून काही जागरूक महिलांनी यासंदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये फसवणूक झालेल्या एका महिलेने खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संजय पाटील, धनंजय घोले यांसह या महिलांना प्रत्यक्ष त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे भरण्यासाठी सांगणाऱ्या दापोली येथील त्यांच्या सहकारी मीनाक्षी शेडगे यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
खेड च्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांचे एक पथक पाठवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून संजय पाटील आणि धनंजय घोले यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खेड च्या पोलीस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत.
www.konkantoday.com