
सुषमा अंधारे यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती
मुंबई : ‘आम्हीच खरी शिवसेना’ म्हणत पदांचे वाटप करणार्या शिंदे गटाची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी खिल्ली उडवली. नसलेल्या शिवसेनेतील पदांची गमतीशीर मांडणी सुरू आहे. पण, आम्ही खर्याखुर्या शिवसेनेची पुनर्बांधणी करत आहोत. राज्यभरात विशेषतः ग्रामीण भागातील महिलांकडे नेतृत्वाच्या जबाबदार्या सोपविणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सांगितले. आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांची लगेचच उपनेते पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे, खा. अरविंद सावंत, आ. सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. अंधारे यांच्यासह पुरोगामी चळवळतील अनेक कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे म्हणाले की, सध्या कोण खरे प्रतिगामी आणि कोण पुरोगामी हे ठरवता येत नाही. संविधानाची आणि देशातील लोकशाही वाचविण्याची लढाई सुरू आहे. सध्या कायदा आणि जनता अशा दोन आघाड्यांवर लढाई सुरू आहे. ही एकट्या शिवसेनेची लढाई नाही. तर, देशातील लोकशाही किती काळ टिकणार याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे. जे लोक इकडे वाढले, मोठे झाले, ते आता तिकडे गेले आहेत. तर, पलीकडच्या वाटणार्या, वेगळ्या विचारांच्या सुषमा अंधारे शिवसेनेची भूमिका पटल्यामुळे उघडपणे सोबत आल्या आहेत. संकटकाळात खांद्याला खांदा लावून मैदानात उतरतात त्यांचे मोल आयुष्यभर राहते, असे सांगत शिवसेनेच्या पुनर्बांधणीचे काम सुरू केल्याचे ठाकरे म्हणाले. सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश करताच तत्काळ त्यांची उपनतेपदावर वर्णी लावण्यात आली. उद्धव ठाकरे यांनी त्याची घोषणा केली. नीलम गोर्हे यांच्यासोबत शिवसेनेची महिला आघाडी मजबूत करत ग्रामीण भागात पक्ष विस्तार होईल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच, अधिकाधिक सदस्य नोंदणी आणि शपथपत्राची भेट हवी असल्याचेही ठाकरे यावेळी म्हणाले.