अशीही देशभक्ती! 100 फुटी ध्वजस्तंभाची दुरुस्ती करणार्या क्रेनच्या मालकाने 5 लाख भाडे घेतलेच नाही!
रत्नागिरी : माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या काळात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 100 फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात आला होता. या ठिकाणी आय लव रत्नागिरी हा लॅण्डमार्कही उभारण्यात आला. त्यामुळे रत्नागिरीकरांसाठी हा ध्वजस्तंभ गौरवाचे स्थान झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेला 100 फुटी ध्वजस्तंभाची दुरुस्ती शुक्रवारी महाकाय क्रेनच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी क्रेन मालकाने यासाठी कोणताही मोबदला न घेता, आपली राष्ट्रभक्ती दाखवून दिली. या स्तंभाच्या दुरुस्तीसाठी क्रेन आणण्याला सुमारे पाच लाख भाडे लागणार होते.ते न घेतल्याने या क्रेन मालकाचे कौतुक होत आहे. समुद्र जवळ असल्याने या भागात उंचावर वार्याचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे या स्तंभावरील ध्वज फार काळ टिकत नसे. त्याचप्रमाणे ध्वज नव्याने लावण्यासाठी खादी ग्रामोद्योग विभागाकडे विशिष्ठ प्रकारच्या कापडासाठी मागणी नोंदवावी लागत असते.कोरोना काळामुळे मागील सुमारे 2 वर्षापासून या ध्वज स्तंभावर ध्वज फडकवला न गेल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या ध्वज स्तंभावरील केबल देखील तुटल्याने नवीन ध्वज फडकावण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. या कामासाठी अवाढव्य क्रेनची आवश्यकता होती. जिल्हा प्रशासनाने चौकशी करता अशी क्रेन मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार असल्याचे कळले. या क्रेन मालकाशी संपर्क साधला असता त्याने रत्नागिरीत येण्याची तयारी दाखवली. या क्रेनचे 8 तासांचे भाडे तब्बल 5 लाख रुपये इतके आहे. मात्र तिरंग्याच्या आणि देशाच्या प्रेमापोटी हे भाडे या क्रेनच्या मालकाने नाकारले.