अबब! नारळाएवढा मूतखडा काढला; धुळे जिल्ह्यातील घटना
धुळे : शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मूतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मूतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आदिवासी शेतकर्याचे प्राण वाचले आहेत.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार लघवीचा त्रास होत होता. त्यांनी धुळे येथील तेजनक्ष फाऊंडेशनमध्ये येऊन तपासण्या केल्या होत्या. तपासणी अहवालात रुग्णाच्या ब्लॅडरमध्ये मोठा खडा असल्याचे लक्षात आल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करीत असताना हा खडा ब्लॅडरच्या हाडांमध्ये रुतून बसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा खडा हाडातून बाहेर काढताना 20 ते 25 मिनिटे आमचे वैद्यकीय कसब पणाला लागले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये ती 25 मिनिटे आमच्यासाठी आणि रुग्णासाठीही खूपच आव्हानात्मक होती. परंतु, रुग्णाचे अन्य अवयव व्यवस्थित कार्यान्वित ठेवताना तो बाहेर काढत शस्त्रक्रिया यशस्वी केली. चौरे यांची सखोल आरोग्य तपासणी केली असता, त्यांना मूतखड्यामुळे अन्य कोणताही गंभीर आजार झाला नसल्याची बाब डॉ. पाटील यांनी स्पष्ट केली. चौरे यांच्या शरीरातून बाहेर काढण्यात आलेला मूतखडा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खडा असल्याचे निदर्शनास आल्याने ही माहिती डॉ. पाटील यांनी इंडिया बुक यांना कळविली. त्यांनीदेखील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा मूतखडा असण्यावर शिक्कामोर्तब केले. डॉ. आशिष पाटील यांच्या शस्त्रक्रियेची दखल इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून, त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. चौरे यांच्या मूत्राशयातून काढण्यात आलेल्या मूतखड्याचा आकार 12.5 बाय 12.75 सेंटिमीटर असून, हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा मूतखडा असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे.