जांभ्या दगडाचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी लांजा तहसीलदारांनी ठोठावला दोन लाखांचा दंड
लांजा : जांभ्या दगडाचे विनापरवाना आणि अनधिकृतपणे उत्खनन केल्याप्रकरणी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी तालुक्यातील वाडीलिंबू येथील विदिषा विश्वास पावसकर यांना दोन लाख 12 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे. पावसाळ्याचे जून आणि जुलै महिने संपले तरीही लांजा तालुक्याच्या वाडीलिंबू सापुचेतळे परिसरात विनापरवाना जांभ्या दगडाचे उत्खनन केले जात असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. वाडीलिंबू येथील विदिषा विश्वास पावसकर यांनी अनधिकृतपणे जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याची बाब महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. याबाबत प्रशासनाकडून प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचे लक्षात आले होते. विदिशा पावसकर यांनी विनापरवाना 14 ब्रास जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याचे आढळून आले होते.
अशाप्रकारे विनापरवाना जांभ्या दगडाचे उत्खनन केल्याप्रकरणी लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार श्रीमती विदिषा विश्वास पावसकर यांनी 14 ब्रास माती उत्खनन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. यामध्ये 14 ब्रास माती उत्खनन केल्याबाबत प्रति ब्रास बाजारमूल्य दंड 3000 चे प्रमाणे 14 ब्रासचे 42 हजार रुपये आणि त्याचे पाच पट म्हणजेच दोन लाख दहा हजार इतका दंड आणि प्रति ब्रास जांभा दगड रुपये 150 ते प्रमाण 14 ब्रासचे 2100 असा एकूण 2 लाख 12 हजार 100 रुपये दंड ठोठावला आहे.