दापोली – आंजर्लेमार्गे केळशी या मार्गावर सुरू असलेल्या एसटी बस फेर्या पुन्हा पूर्ववत
दापोली : गेले 20 ते 22 वर्षे दापोली – आंजर्लेमार्गे केळशी या मार्गावर सुरू असलेल्या एसटी बस फेर्या रद्द करत या मार्गाच्या सर्व फेर्या आडे फाटा बोरथळ मार्गे केळशीला वळवण्यात आल्या होत्या. यामुळे येथील शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी, प्रवासी यांची गैरसोय होत होती. ग्रामस्थ व माजी आमदार संजय कदम यांच्या पुढाकाराने या फेर्या पूर्ववत झाल्या आहेत.
याबाबत येथील ग्रामस्थ आणि उपसरपंच मंगेश महाडिक यांनी आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांना लेखी पत्र देऊनही याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे ही बाब ग्रामस्थांनी थेट माजी आमदार संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिली.
येथील आंजर्ले कोपरी येथे माधव महाजन कॉर्नर आहे. त्या ठिकाणाचा व्हीडिओ काही दिवसांपूर्वी एसटी चालकांनी तयार करून पाठवला. गटारात गाडीचे चाक जाईल, असे त्यात चित्रित केले होते. हा व्हीडिओ व्हायरल करून भीती पसरवण्यात आली, असे ग्रामस्थांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे येथील फेर्या रद्द झाल्या, असा आरोप देखील ग्रामस्थांचा आहे.
याबाबत माजी आमदार संजय कदम, संदीप राजपुरे आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी दापोली एसटी बस आगारात जाऊन व्यवस्थापकांची भेट घेतली. आंजर्ले येथे नेमकी काय वस्तुस्थिती आहे, हे आम्हाला प्रत्यक्ष दाखवा, असे आगार व्यवस्थापक यांना सांगितले. यावेळी आंजर्ले येथे प्रत्यक्ष एसटी गाडी घेऊन जात पाहणी केली. त्यावेळी येथे कोणतीही अडचण नाही, असे आगार व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर येथील फेर्या पूर्ववत करण्यात आल्या. यावेळी आंजर्ले सरपंच स्वप्नाली पालशेतकर, उपसरपंच मंगेश महाडिक, सदस्य मेघना पवार, रसिका भोसले, किशोर साळवी आदी उपस्थित होते.