कोरोना काळानंतर 8 कैदी पुन्हा कारागृहात स्वत:हून हजर
रत्नागिरी : कोरोना काळात राज्यातील अनेक कारागृहातील शिक्षा भोगणार्या कैद्यांना रजेवर पाठविण्यात आले होते. यामध्ये रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहातील खुल्या कारागृहातील 15 कैद्यांचा समावेश होता. गेली 2 वर्षे 15 कैदी रजेवर होते. यातील 8 कैदी पुन्हा कारागृहात स्वत:हून हजर झाले आहेत. तर उर्वरित या आठवडाभरात हजर होतील, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहाकडून देण्यात आली.
जे कैदी कोरोना काळात रजेवर गेले, त्यापैकी जवळपास 50 टक्के कैदी हजर न झाल्याची बाब राज्यातील मोठ्या कारागृहांमध्ये निदर्शनास आली आहे. रत्नागिरीतील ओपन जेलमधील कैदी स्वत:हून हजर झाले आहेत.
पुणे, मुंबई, नागपूर या सारख्या महानगरातील कारागृहातील रजेवर गेलेल्या कैद्यांना हजर व्हा म्हणून सांगितले तरी अद्यापही हजर झालेले नाही तर काही फरार झाल्याची माहिती समोर आली असल्याचे काही दिवसांपूर्वी वृत्त ऐकावयास मिळाले होते.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा कारागृहातील ओपन जेल म्हणजे या ठिकाणी जे शिक्षेचे 15 कैदी होते त्यांना 2 वर्षे रजेवर सोडण्यात आले होते. मात्र, ते हजर झाले बाकीचे देखील या आठवड्यात हजर होणार असल्याचे संबंधित कैद्यांनी कळवले आहे.