गद्दारांना माफी नाही! आता रत्नागिरीत उदय होईल तो बनेंचा!
रत्नागिरी : गद्दारांनी भाजपाला हाताशी धरून पक्षाच्या प्रमुखाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले. आजही आम्ही शिवसैनिक आहोत, असे ते सांगत आहेत. मात्र आता गद्दारांना थारा नाही. रत्नागिरीत आता उदय होईल तो बनेंचा, अशा शब्दात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य उदय बने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. विधानसभा निवडणुकीच्या शिवसेना उमेदवाराची अप्रत्यक्षपणे घोषणा केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वयंसेवी संस्थेच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी, माजी राज्य मंत्री रवींद्र माने, जि.प.चे माजी उपाध्यक्ष, शिवसैनिक यशवंत कदम, जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना तालुकाअधिकारी प्रसाद सावंत, महिला तालुका संघटक साक्षी रावणंग, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वयाच्या 61व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल श्री.गीते यांनी श्री. उदय बने यांचे अभीष्टचिंतन करत त्यांच्या राजकारणातील प्रशासकीय कामकाजाचे कौतुक केले. त्यानंतर शिवसेनेत राहून स्वतंत्र गट स्थापन करणार्या शिंदे गटाचा श्री. गीते यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडताना डोळ्यातून अश्रू काढले. आज त्याच अश्रुचा महापूर येऊन गद्दार त्यामध्ये वाहून जातील, असे सांगत भविष्यात न्यायालयीन लढाईही शिवसेनाच जिंकेल. न्यायालय शिवसेनेला नक्की न्याय देईल त्यावेळी सर्व गद्दार अपात्र होतील. त्यानंतर राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लावली जाईल तर गुजरात राज्याच्या निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातही सार्वत्रिक निवडणुका होतील असे भाकित श्री.गीते यांनी वर्तवले आहे.