राजापूरचा पूल : कोंढेतडच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव जैसे थे
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये सर्वात उंच असलेल्या अर्जुना नदीवर पुलाचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदार कंपनीने कोंढेतडच्या बाजूने टाकलेला मातीचा भराव तसाच ठेवून दिला आहे. यामुळे नदीपात्र अरुंद बनल्याने पुराचा धोका वाढला आहे. याबाबत कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना भराव काढण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार? असा सवाल त्यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
अर्जुना नदीपात्राच्या काठावर मातीचा भराव काढण्याचे संबंधित ठेकेदाराला महसूल प्रशासनानेही निर्देश दिले असून, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर सर्वाधिक उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. या पूलाच्या बांधकामाच्यावेळी संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी आणि कोंढतडच्या बाजूने मोठ्याप्रमाणात मातीचा भराव टाकला. पावसाळ्यामध्ये हा भराव जैसे थे राहिल्याने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका गतवर्षी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला बसला होता. काहीप्रमाणात वाहून आलेली माती बंदरधक्का परिसरामध्ये साचल्याने नदीपात्रातील गाळाच्या संचयामध्ये अधिकच भर पडली आहे. त्यानंतर, वारंवार केलेल्या तक्रारीनंतर संबंधित ठेकेदार कंपनीने नदीपात्राच्या मध्यभागी टाकण्यात आलेला मातीचा भराव काढला. मात्र, कोंढेतडच्या बाजूचा भराव जैसे थे स्थितीमध्ये ठेवला. त्यामुळे पूरस्थितीला आमंत्रण देणारा आणि त्या भागामध्ये नदीपात्र अरूंद होण्यास कारणीभूत ठरणारा भराव तातडीने काढावा अशी मागणी लांजेकर यांनी केली होती.
याबाबतचे निवेदन त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्यांच्या निवेदनासह येथील व्यापार्यांनीही महसूल प्रशासनाला निवेदन देऊन पुराला कारणीभूत ठरणारा गाळ उपशासह माती भरावाचा उपसा करण्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे महसूल प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला मातीचा भराव उपसा करण्याचे निर्देश दिले.