
पुरापासून बचाव होऊ दे… चिपळुणात वाशिष्ठी नदीचे नागरिकांनी केले पूजन
गतवर्षी 22 जुलै रोजी चिपळूणमध्ये महापूर आला होता. या महापुराला एक वर्ष पूर्ण होत आहे. यावर्षी वाशिष्ठी व शिवनदीने आपले पात्र सोडले नाही. त्यामुळे वाशिष्ठी नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूणमधील नागरिकांनी बुधवारी सायंकाळी वाशिष्ठी पूजन केले.
या पुढच्या कालावधीत शहराचा पुरापासून बचाव होऊ दे, अशी प्रार्थना करून वाशिष्ठी नदीमध्ये श्रीफळ आणि साडीचोळी अर्पण करण्यात आली. चिपळूण बचाव समिती आणि नागरिकांच्यावतीने सायंकाळी गांधारेश्वर येथे जाऊन वाशिष्टी पूजन करण्यात आले.
यावेळी लता भोजने, आदिती देशपांडे, भक्ती कदम, स्वाती भोजने, रसिका देवळेकर, धनश्री जोशी, गौरी कासेकर, चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने, बापू काणे, महेंद्र कासेकर, सतीश कदम, किशोर रेडिज, उदय ओतारी, दादा खातू व ग्रामस्थ उपस्थित होते.