
जिल्हा परिषद परिचरांच्या बदल्या कराव्यात
जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचारी (परिचर) यांची बदली प्रक्रिया तसेच प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
बदल्यांसाठी सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली पण काही कारणास्तव परिचर बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. एकाच विभागात 8 ते 10 वर्षे काम करत आहोत. यामुळे बदल्या होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद अंतर्गत लवकरात लवकर बदल्या कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
आरोग्य विभागात कार्यरत असणार्या परिचरांना इतरत्र असणार्या प्रतिनियुक्ती रद्द करून मूळ ठिकाणी नियुक्त्या द्याव्यात. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त पुरूष परिचर आहेत तेथे एखादी ही परिचर टाकावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत यांच्याकडे संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम भगत, विश्वनाथ घाणेकर, दत्ताराम जोशी आदी उपस्थित होते.