विधवा नव्हे पूर्णांगिनी म्हणा! अनुसया संस्थेमार्फत सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ
रत्नागिरी : समाजातील विधवा महिलांवरील अनिष्ट प्रथेला आळा घालण्यासाठी येथील अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेकडून विधवा शब्द टाळून पूर्णांगिनी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सामाजिक संस्थेमार्फत असे उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श या संस्थेने समाजासमोर आदर्श ठेवला आहे. तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणार्यांना पूर्णांगिनींचा सन्मान तेही एकाच छताखाली ही फार मोठी बाब असल्याचे उद्गार जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी इुंदराणी जाखड यांचे काढले.
खेडशी येथील अनुसया महिला स्वयंसेवा संस्थेमार्फत विधवांना समाजात प्रत्येक चांगल्या उपक्रमात सन्मान मिळावा. त्यांनाही सर्वसामान्यपणे आयुष्य जगता यावे या हेतूने समाजातील विविध ठिकाणी काम करणार्या पूर्णांगिनींना सन्मानाने गौरविण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव, न्यायाधीश अमित कुलकर्णी, संस्थेच्या अध्यक्षा नीलम पालव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प समन्वयक घाणेकर, एकात्मिक बालविकास अधिकारी इंगवले, जिल्हा उद्योग प्रकल्प संचालक विद्या कुलकर्णी, संस्थेच्या मनाली साळवी, भडे सरपंच तेंडुलकर आदी उपस्थित होते.
आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित आहेतच. पतीच्या निधनावेळी पत्नीचे कुुंकू पुसणे तिचे सौभाग्य अलंकार काढून घेणे व अन्य कुप्रथा आजही समाजात प्रचलित आहेत या कुप्रथांचे पालन करणे अनुचित असून, त्याबाबत समाजात व्यापक जनजागृती करण्याच्या हेतूने नुकतेच अनुसया संस्थेमार्फत पुर्णांगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रस्तावनेत साक्षी पालव यांनी सांगितले.
महिलांसाठी वेगवेगळे कायदे आहे, हे कायदे नेमके कोणते आहे याचा फायदा पूर्णांगिनींना कसा होईल याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नेहमीच प्रयत्न असतात त्यामुळे यापुढेही या योजनांविषयी, कायदेविषयक जागरुकता निर्माण करण्यात येईल असे न्यायाधीश अमित कुलकर्णी यांनी सांगितले. नीलम पालव यांनीदेखील अनुसया या संस्थेच्या विविध उपक्रमामार्फत माहिती दिली. या पूर्णांगिनींना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी संस्था पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन सपना देसाई यांनी केले.