बोंबलेवाडी येथे पूर्ववैमनस्यातून प्रौढाच्या डोक्यात मारले फावडे
रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा बोंबलेवाडी येथे पूर्ववैमनस्यातून प्रौढाच्या डोक्यात फावड्याने मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम बाळकृष्ण सागवेकर (हातखंबा, बोंबलेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद गजानन आबा देवरुखकर (बोंबलेवाडी, हातखंबा) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन देवरुखकर आणि दत्ताराम सागवेकर हे एकाच वाडीत राहणारे आहेत. त्यांचे ४ वर्षापूर्वी भांडण झाले होते. त्यामुळे एकमेकांशी बोलत नव्हते. १७ जुलै रोजी सायंकाळी ४.१५ वा. च्या सुमारास गजानन देवरुखकर हे घरातून दुकानात जात असताना दत्ताराम सागवेकर याने मागील भांडणाचा राग मनात धरुन देवरुखकर यांना कटाक्ष देत अंगावर धावत गेला. तसेच रस्त्याचे गटाराचे काम करणारे कामगारांचे फावडे हातात घेऊन देवरुखकर यांच्या उजव्या हातावर मारुन जखमी केले . तसेच छत्रीही डोक्यात मारुन जखमी केले. जखमी देवरुखकर यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार दत्ताराम सागवेकर याच्यावर भादविकलम ३२४, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.