गुहागर तालुक्यातील वीज खांबांवर आपत्ती
गुहागर : तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका महावितरणाला बसला आहे. सडलेल्या खांबांबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी गुहागरच्या नैसर्गिक आपत्ती ग्रुपवर झळकत आहेत. यामुळे सुमारे 400 धोकादायक वीज खांबांच्या आपत्तीची टांगती तलवार गुहागर तालुक्यावर आहे.
तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पाश्वभूमीवर गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे यानी तालुक्याचा नैसर्गिक आपत्ती हा स्वतंत्र ग्रुप तयार केला आहे. यामध्ये तालुक्यातील तलाठी, सरपंच, ग्रामसेवक, सर्व विभागाचे अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आहे. तालुक्यात घडणार्या प्रत्येक घटनेची माहिती व त्यावर तत्काळ निवारण करण्याच्या सूचना तहसीलदारांकडून दिल्या जात आहेत. परिणामी संबंधित विभागही यावर तातडीने कार्यवाही करत आहे. पाऊस सुरू झाल्यापासून वीज वाहिन्यांवर वृक्ष कोसळून नुकसान झाल्याच्या घटना घडत आहेत. अशामध्ये अनेक गावातून सडलेले व वाकलेल्या धोकादायक वीज खांबांचे फोटो या ग्रुपवर झळकत आहेत. अनेक ठिकाणामधून ग्रामस्थांच्या अंगणामधील व वाडीवस्तीतील सडलेले वीज खांब धोक्याची गांभिर्यता दाखवून देत आहेत.
सडलेल्या वीज खांबांच्या फोटोबरोबर वीज खांब बदलण्याबाबत वर्षभर पाठपुरावा करूनही महावितरण लक्ष देत नसल्याच्याही आवर्जून पोस्ट पडत आहेत. यामुळे तालुक्यातील सडलेल्या वीज खांबांचा विषय गंभीर बनला आहे. गुहागर महावितरण विभागाकडून घेतलेल्या अधिक माहितीमध्ये तालुक्यात सुमारे 400 वीज खांब धोकादायक आहेत. यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये इतर नुकसानीपेक्षा सडलेल्या वीज खांबांची आपत्तीच मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
वीज खांब बदलण्यासाठी महावितरणकडून आवश्यक प्रस्ताव पाठवून काम करण्याची निविदाही बाहेर पडली आहे. परंतु ऑक्टोबर 2021 पासून वाढीव इंधन दरामुळे सहाजिकच साहित्याचे दरही वाढले आहेत. यामुळे महावितरणच्या जुन्या डीएसआर प्रमाणे काम करण्यास ठेकेदार तयार नाही.