कशेडी घाटात पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची डंपरला धडक

पोलादपूर : तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील चोळई गावातील अपघातांची मालिका चौपदरीकरणानंतरही अद्याप थांबलेली दिसून येत नाही. सोमवारी दुपारी पोकलेन घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची डंपरला धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जखमी झाल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
सोमवार दि. 18 जुलै 2022 रोजी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास खेडकडून मुंबईच्या दिशेने ट्रेलर (क्रमांक आरजे 01 जीसी 3209) मधून पोकलेन मशीन (क्रमांक आरजे 14 जीई 3819) घेऊन तीव्र वळण उतारावरून वेगाने येत असताना चालकाचा ताबा सुटला. यानंतर ट्रेलर आणि पोकलेन मशीनसह पोलादपूरकडून धामणदिवीच्या दिशेने जाणाऱ्या डम्परला समोरासमोर रस्त्याच्या मधोमध धडक बसली. यामुळे डम्पर आणि ट्रेलर ही दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यावेळी ट्रेलरमधील हिरालाल राधाकिशन चौधरी (वय 16 वर्षे) आणि प्रधान रामकिशन चौधरी (वय 23 वर्षे), दोघेही रा.समोद, ता.नसेराबाद, जि.अजमेर, राजस्थान तसेच डम्परमधील शंकर काशिनाथ पवार (वय 40 वर्षे, जोगेश्वरी गाडीतळ, पोलादपूर) आणि तुषार नीळकंठ सावंत (वय 36 वर्षे, सह्याद्रीनगर, पोलादपूर) असे चौघेजण जखमी झाले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी गुन्हा.र.नं. 59-2022 नुसार ट्रेलरचा चालक प्रधान रामकिशन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार व्हि.जी.चव्हाण हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button