
साडवली सह्याद्रीनगर येथे जुगार धंद्यावर धाड, सुमारे १ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त
देवरुख : संगमेश्वर पोलिसांनी जुगाराविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. साडवली सह्याद्रीनगर येथे पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून १ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत ८ संशयितांना अटक केली आहे. संगमेश्वर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी सह्याद्री नगर येथील कदम चाळ येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पूर्ण तयारीनिशी येथे छापा टाकला. संशयित विजय गणपत कदम यांच्या मालकीच्या खोलीमध्ये हा जुगार अड्डा सुरू होता. यामध्ये जुगार खेळणारे विजय गणपत कदम (घरमालक), संदीप अनंत देसाई, गंगेश शिवराग पर्शराम, अब्दुल सत्तार दाऊद लांबे, महेंद्र मनोहर लिंगायत, आत्माराम शंकर देवळेकर, भिकशेठ हरिश्चंद्र पाथरे, सुधीर बाबसा कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली. कारवाईमध्ये रोख रक्कम व इतर साहित्यासह १ लाख ९५ हजार ३८०चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. देवरूख पोलिस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैद्य धंद्यांवर धाडी टाकण्याच्या पद्धतीने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.