राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्याची दुरवस्था
राजापूरहून रेल्वेस्टेशनला जाणार्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. असे असताना पावसाळा सुरू झाला. त्यामुळे हा रस्त्या अधिकच खराब झाला आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वेळोवेळी तक्रार देऊनही दखल घेतली नसल्याने अखेर सोल्ये येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई यांनी कोकण रेल्वेच्या भरारी पथकाला रस्त्याची झालेली दयनीय अवस्था निदर्शनास आणून
दिली.
राजापूर रेल्वेस्टेशन रस्त्यावरील राजापूर ते ससाळे व जांभळी तिठा ते रेल्वेस्टेशन रस्ता अत्यंत खराब झाला आहे. यामधील राजापूर ते ससाळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पावसाळा सुरू झाल्याने रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला आहे. तर पुढील जांभळीतिठा ते रेल्वेस्टेशन या सुमारे दीड किमीच्या रस्त्याची तर फारच दयनीय अवस्था झाली
आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यावेळी निदान पावसाळ्यात हा रस्ता सुस्थितीत रहावा, म्हणून खड्डे बुजविण्याची मागणी केली.
या मागणीकडेही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. काही दिवसांनी या रस्त्यावरील वाहतूकही बंद करावी लागण्याची शक्यता आहे. या रस्त्याबाबत नेहमीच या परिसरातील ग्रामस्थांनी दूरध्वनीवरून तक्रारी दिल्या आहेत.
रस्ता बंद होण्याची स्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. रेल्वेस्टेशनला जाणारा रस्ता असल्याने वाहनांची कायम वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे जिकिरीचे झाले
आहे.
राजापूर भेटीला आलेल्या कोकण रेल्वेच्या भरारी पथकाला संबंधित रस्त्याबद्दल माहिती देण्यात आली. रस्त्याची झालेली दयनीय अवस्था येथील सामाजिक कार्यकर्ते शशिकांत प्रभुदेसाई यांनी निदर्शनास आणून दिली आहे.