
आरजीपीपीएल प्रकल्पाला ग्रामपंचायतींनी बजावली 4 कोटी 25 लाखांची नोटीस
गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाला येथील अंजनवेल, रानवी व वेलदूर ग्रामपंचायतींनी एकूण 4 कोटी 25 लाख 45 हजार 580 रूपयांची जमीन व इमारत कराची नोटीस बजावली आहे. पहिली पंधरा दिवसांची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र तीन नोटीसनंतरही कर न भरल्यास जप्तीची कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाने 2021- 22, 2022-23 या दोन वर्षाचा येथील अंजनवेल, रानवी, व वेलदूर ग्रामपंचायतीचा इमारती व जमीन कर थकवला आहे. कर देण्यास कंपनीने नकार दिला होता. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर वसुली कायद्याप्रमाणे वसुलीच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही केली होती. याविरोधात आरजीपीपीएल कंपनीने पंचायत समितीमध्ये अपील दाखल केले होते. हा दावा पाच महिने सुरू होता. जून महिन्यामध्ये या दाव्याचा निकाल येथील तीनही ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला होता. या दाव्याच्या निकालामध्ये ग्रामपंचायतीने तत्काळ कर वसुली करावी, असा आदेश गटविकास अधिकार्यांनी दिला होता. त्याप्रमाणे अंजनवेल ग्रामपंचायतीने 2021-22 चा 1 कोटी 53 लाख 78 हजार 311 रूपये, 2022-23 चा 1 कोटी 44 लाख 44 हजार 257 रूपये, रानवी ग्रामपंचायतीने 2021-22 चा 38 लाख 53 हजार 435 रूपये, 2022-23 चा 34 लाख 83 हजार 852 रूपये, वेलदूर ग्रामपंचायतीने 2021-22चा 37 लाख 69 हजार 559 रूपये, 2022-23 चा 36 लाख 16 हजार 416 रूपये जमीन व इमारती कराची मागणी पहिल्या नोटीसद्वारे केली आहे. पहिल्या नोटीसचा 15 दिवसांचा कालावधी संपुष्टात आला आहे. अशा तीन नोटीस बजावण्यात येणार आहेत. त्यानंतर जप्तीची कार्यवाही केली जाणार असल्याचे विस्तार अधिकारी स्वप्नील कांबळे यांनी सांगितले.