
असेही दातृत्व! मेडिकलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त गुहागरला दिला 7 लाखांचा वैकुंठ रथ
गुहागर : शहरातील चैताली मेडीकलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अरूण ओक यांनी गुहागर शहरवासीयांसाठी सुमारे 7 लाख रूपये खर्च करून वैकुंठ रथ दिला आहे. हा वैकुंठ रथ गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल व मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
अरुण ओक यांनी येथील जनतेला दिलेला बैकुंठ रथ ही अद्वितीय संकल्पना असून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या समाजाभिमुख दातृत्वाला मी सलाम करते, असे प्रतिपादन तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी केले. नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले, आज ओक यांनी नगरपंचायतीकडे वैकुंठ रथ दिला असून त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाईल. शहराच्या विकासात अशाप्रकारच्या व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा असतो. ओक यांनी नगरपंचायतीकडे दिलेल्या या रथाची जबाबदारी आमची आहे. पोलिस निरिक्षक बी. के. जाधव यांनी बोलताना सांगितले, ज्यावेळी बेवारस मृतदेह मिळून येतात. त्यावेळी त्यांना स्माशनभूमीपर्यंत आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे अशावेळी ओक परिवाराने दातृत्वाने दिलेला हा वैकुंठ रथ नक्कीच तालुकवासीयांसाठी उपयोगात येईल, असे सांगितले.
या लोकार्पण कार्यक्रमातून वैकुंठ रथ वाहनाच्या चाव्या गुहागर नगरपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर वैकुंठ रथासमोर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी श्रीफळ वाढवले. या कार्यक्रमातून अरूण ओक यांनी ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी 5 हजार रूपयांची देणगी दिली. यावेळी चैताली मेडीकलचे जुने कर्मचारी मनोज सांडीम, सदानंद जांगळी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या वैकुंठ रथाच्या गाडीचे कायमस्वरूपी मेंटनेन्स करण्याची जबाबदारी घेणारे वैद्य आटोमोबाईलचे मालक प्रसाद वैद्य यांचाही अरुण ओक यांनी सत्कार केला.
यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलिस निरीक्षक बी. के. जाधव, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे, अरूण ओक, निहाल गुढेकर, अजय खातु, प्रसाद वैद्य, संजय सावरकर, राजेंद्र आरेकर, राजन दळी उपस्थित होते.