
मिर्या बंधारा पुन्हा ढासळू लागला
रत्नागिरी: समुद्राला उधाण आल्याने उंच लाटा किनार्यावर धडकत आहे. लाटांचा तडाखा बसून मिर्या बंधारा पुन्हा ढासळू लागला आहे. जाकिमिर्या नजिकच्या उपळेकर बाग परिसरातील बंधारा पुन्हा वाहून गेला आहे. त्यामुळे या भागात पुन्हा समुद्राच्या लाटांचे पाणी थेट मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसांनी अमावास्येपूर्वी येणार्या उधाणामुळे किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जाकिमिर्या-भाटिमिर्या किनार्यावर बंधारा उभारण्यासाठी तब्बल १६९ कोटी रु.च्या कामाचे भूमिपूजन झाले असले तरी प्रत्यक्षात जून्या पद्धतीनेच किनार्यावर दगड टाकण्याचे काम सुरु असल्याने या पावसाळ्यात मिर्यावसियांचा धोका कायम आहे. लाटांचा वेग वाढल्यास येत्या दोन-चार दिवसात बंधार्याला मोठे भगदाड पडण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी वर्तवली आहे.