
काजळी नदीच्या पुरात वाहून गेलेल्या गाईंना वाचवले
रत्नागिरी:- काजळी नदीच्या पुरात अडकलेल्या चार गायींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. एका गायीच्या पोटाला जखम होऊन बरेच रक्त गेले. तर एकीच्या पोटाला टाके घालावे लागले. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे व तत्पर कृतीमुळे सर्व गीर गायी मोठ्या संकटातून वाचल्या आहेत. चारही गायींच्या सुटकेचे हे थरारनाट्य ३ तासाहून अधिक काळ सुरू होते. रत्नागिरीतील ॲंथनी यांच्या कुर्णे (ता. लांजा) येथील शेतघरातून अरुण जोशी हे ४ गीर गायी नदीजवळ गुरुवारी (ता. १४) चरायला घेऊन गेले होते. त्या पाण्याच्या लोंढ्यात सापडल्या. जोशी यांनी शेतघराच्या व्यवस्थापक सुगंधा कडू यांना कळवली. कडू यांनी लांजातील सतीश चांदोरकर यांना फोन करून मदत मागितली. ते आणि कामगार रायबा जोशी धरणाजवळ गेले. दोन गाई आंजणारी दत्तमंदिरासमोर अडकल्या. त्यांना अरुण जोशी यांनी बघितले आणि ते व प्रभाकर गिडिये, मंगेश जाधव, सचिन वाट काढत पोहोचले. पाण्यात उडी टाकून गाईला दोरी बांधली व पाण्याबाहेर काढले. पुनसकोंड येथील लाखण काकींनी तिला घरी सुखरूप पोहोचवले. एक गाय कसरत करत नदीच्या बाहेर आली; पण जंगलामध्ये गायब झाली. दुसरी गाय एका झाडाच्या मदतीने पाण्यावर तरंगत राहिली. दोन गायी प्रवाहासोबत वाहत जात होत्या. सुगंधा कडू यासुद्धा प्रवाहाच्या समांतर बाजूने धावत जाऊन लोकांना गायीवर लक्ष ठेवायला सांगत होत्या. नंतर चांदोरकर व जोशी असुर्डे धरणाजवळ पोहोचले. तेव्हा एक गाय धरणाच्या भिंतीवरच होती व तिथे पोहोचणे अशक्य होते. लगेचच पाण्याच्या प्रवाहाने तिला नदीमध्ये ओढले. हे पाहताच चांदोरकर व जोशी निवसर धरणाकडे रवाना झाले.