सायबाच्या धरणाचे पाणी दूषित करणार्यांवर कारवाईचा इशारा
राजापूर : राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या ठिकाणची जलव्यवस्था प्रदूषित करणार्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. जलस्रोत दूषित करण्यासह त्याला हानिकारक ठरणारे कृत्य करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिला आहे. शहरामध्ये विविध रोग वा साथींचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे येथील स्रोताला नगर पालिकेने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. येथील ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधकाम झालेले कोदवली येथील सायबाचे धरण गेल्या सुमारे 140 वर्षांहून अधिक काळ शहराला पाणीपुरवठा करत आहे. या ठिकाणाहून पाणीपुरवठा होण्यामध्ये अन्य जलस्रोतांच्या तुलनेमध्ये फारसा खर्च होत नसल्याने येथील पाणीपुरवठ्याला विशेष महत्त्व आहे; मात्र, लोकांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे हा जलस्त्रोत दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या जलव्यवस्था स्रोतास हानिकारक ठरतील, अशी कृत्य करण्यास सक्त मनाई केली असून अशी कृत्य करणार्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी भोसले यांनी दिला आहे.