वेसवीतील शाळेचे छप्पर कोसळले; 2 लाखांचे नुकसान
मंडणगड : गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली आहे. 15 जुलै 2022 रोजी मौजे वेसवी येथील उर्दु शाळेच्या इमारतीवरील छप्पर कोसळले. सुदैवाने यावेळी शालेय कामकाज सुरू नसल्याने कुठलाही अपघात झाला नाही. घटनेचे वृत्त कळताच शिक्षण विस्तार अधिकारी ताजुद्दीन परकार, केंद्रप्रमुख अमरदीप यादव यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पुढील कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शाळेचे कामकाज सुरक्षित अन्य ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला असून या घटनेत प्रशालेचे 2 लाख 10 हजार रुपयांचे नुकसान झालेले असल्याची माहिती नमूद केली आहे. या संदर्भात केंद्रप्रमुख अमरदीप यादव यांच्याशी संपर्क साधला असता केंद्र शाळा वेसवी उर्दू येथील खोली क्रमांक 3 व 4 यांचे छप्पर कोसळून नुकसान झाले असल्याची माहिती दिली. याचबरोबर शाळेचे कामकाज सुरू राहण्यासाठी दुसर्या जागेचा ग्रामस्थ शोध घेत असल्याची माहिती दिली आहे. छप्पर कोसळल्याने खोलीमधील शैक्षणिक साहित्य, खिडकी, दरवाजे, यांचे नुकसान झाले आहे.
यंदाच्या पावसाला सुरुवात झाल्यापासून पूर्णत: घरांची पडझड झाल्याने 1 लाख 49 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अंशत: घराची पडझड झाल्याने 5 लाख 79 हजार 230 रुपयांचे नुकसान झाले आहे. गोठ्यांची पडझड झाल्याने 53 हजार 380 रुपयांचे नुकसान झाले आहे.