
लांजा महाविद्यालयात रंगला बोलावा विठ्ठल कार्यक्रम
लांजा : येथील लांजा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व मराठी विभाग यांच्यावतीने आषाढी एकादशीनिमित्त ‘बोलावा विठ्ठल’ या विठ्ठल भक्तिपर अभंग, भजन गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. उपप्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजेश माळी, मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर हे उपस्थित होते. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून संधी निर्माण होतील. विद्यार्थ्यांनी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले व्यक्तिमत्त्व संपन्न करावे.
यावेळी डॉ. के. आर. चव्हाण म्हणाले की, कोव्हिडमुळे आलेल्या मर्यादा आता संपल्या आहेत. नव्याने सुरुवात झाली आहे. महाविद्यालयाने कोरोनाच्या काळात आपले कार्य अव्याहतपणे सुरू ठेवले होते. त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रगतीला बाधा आली नाही. कोविडला संधी मानून महाविद्यालयाने केलेले कार्य कौतुकास्पद आहे. बोलावा विठ्ठल या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना नवेपणा आणि ताजेपणा लाभेल. महाविद्यालयाची यशस्वी परंपरा अधिक उज्ज्वल करण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
याप्रसंगी ‘बोलावा विठ्ठल ’ या सांगितिक कार्यक्रमात विविध अभंग व भजने सादर केली. यामध्ये सिद्धी पेडणेकर, डॉ. के. आर. चव्हाण, डॉ. विक्रांत बेर्डे, प्रा. सिद्धेश खवळे, सिने नाट्य कलाकार व गायक श्री. महेश बामणे, पराग शिंदे, प्रा. अंकिता शिर्के, आशिष मांडवकर, प्राजक्ता माटल, प्रा. अनुप सरदेसाई, प्रा. अवंतिका केळुसकर, प्रा. राकेश सूर्वे, प्रा. आरती शिंदे, गजानन वैद्य, शशांक उपशेट्ये, रविना पवार, प्रा. अनुप्रिया प्रभू, प्रा. क्रांती जाधव, प्रा. ऐश्वर्या सावळगी यांनी विठ्ठलभक्तीपर अभंग, भजने आणि गीते सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. महेश बावधनकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. राजेश माळी यांनी केले व आभार डॉ. राहुल मराठे यांनी मानले.