राजापूर तालुक्यातील साखर येथे बिबट्याचा वासरांवर हल्ला
राजापूर : तालुक्यातील साखर मिरगुलेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. येथील शेतकरी रामचंद्र शंकर मिरगुले यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने दाेन वासरे फस्त केली. ही घटना शुक्रवारी रात्री (दि.15) घडली. या घटनेमुळे परिसरात भीती पसरली आहे. साखर, मिरगुलेवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे गावात काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी रात्री बिबट्याने गावातील रामचंद्र शंकर मिरगुले यांच्या गोठ्याकडे मोर्चा वळविला. गोठ्यात घुसुन दोन वासरांना आपले भक्ष बनविले. यामुळे मिरगुले यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकताच कुवेशी येथे बिबट्याने घरात घुसून हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने साखर, मिरगुलेवाडीत घुसून दोन वासरे ठार केल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. परिसरात मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.