
पावसाने भातशेतीचे नुकसान; पंचनामे करण्याची खेड राष्ट्रवादीची मागणी
खेड : गेल्या चार दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात अनेक ठिकाणी भातशेतीची नासाडी झाली आहे. या नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना मोबदला जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार संजय कदम व जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी राजश्री मोरे यांना देण्यात आले. सलगपणे होणार्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची भातरोपे कुजली आहेत. यामुळे लावणीची कामे रखडली आहेत. भातशेती पाण्यात राहिल्यामुळे मोठी नासाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भातशेतीची पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष स. तु. कदम, अॅड. आनंद भोसले, प्रकाश मोरे, सुनील साळुंखे, सचिन पवार, तौसिफ खोत, अजय माने, गोविंद राठोड, श्रीधर गवळी, प्रदीप सकपाळ, अक्षय बेलोसे, अक्षय पाटणे, किशोर साळवी यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.