
नांदगाव स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत
कोकण रेल्वेचे विद्युतीकरण झाल्यानंतर मालगाडय़ा विजेवर धावत असून नांदगाव स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक तासभर विस्कळीत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.या बिघाडामुळे जनशताब्दी नांदगाव स्थानकात तर कोचिवेली-बिकानेर कणकवली स्थानकात अडकून राहिल्या. विद्युतीकरणानंतर अशा प्रकारे ओएचई तुटल्याने गाडय़ा खोळंबल्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे मार्चपासून विद्युतीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मालगाडय़ा प्राधान्याने विजेवर चालविण्यात येत आहेत. शुक्रवारी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारी अप दिशेच्या मालगाडीचा पेंटोग्राफ अडकून ओव्हरहेड वायर तुटल्याने मालगाडी बंद पडली. अखेर दुरुस्ती पथकाने ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. सायं. 5.05 हा बिघाड दुरुस्त करण्यात यश आल्याने कोकण रेल्वेच्या रखडलेल्या गाडय़ा पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com