
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती या किनरे भगिनींनी रौप्यपदकाला गवसणी घातली
वैभव श्रीरामेच्या दुहेरी सोनेरी यशानंतर रविवारी प्रज्ञा गायकवाड आणि सानिका जाधव यांनी महाराष्ट्र संघाला 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील योगासनात आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले.महाराष्ट्राच्या या दोन्ही युवा योगपटू आर्टिस्टिक प्रकारात विजेत्या ठरल्या. महाराष्ट्र संघाचे योगासनामधील हे तिसरे सुवर्णपदक ठरले. याचबरोबर रत्नागिरीच्या पूर्वा आणि प्राप्ती या किनरे भगिनींनी रौप्यपदकाला गवसणी घातली. पूर्वाचे स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले. महाराष्ट्राने योगासन स्पर्धेत एकूण सहा पदकांची कमाई केली आहे.
महिलांच्या आर्टिस्टिक पेअर इव्हेंटमध्ये महाराष्ट्र संघाकडून प्रज्ञा आणि सानिका यांनी सुरेख कामगिरी केली. सर्वाधिक गुणांची कमाई करत या दोघींनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. पॅरिस आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तीन रौप्यपदके जिंकणाऱ्या पूर्वाने आपली लहान बहीण प्राप्ती हिच्यासोबत राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. आर्टिस्टिक पेअर मधील या दोघींची कामगिरी लक्षवेधी ठरली. सर्वोत्तम कसरत आणि लवचिकता संतुलन या सर्वोत्तम कामगिरीतून त्यांनी रौप्यपदकाला गवसणी घातली. मोठय़ा बहिणीला सर्वोत्तम साथ देत प्राप्तीनेही लक्षवेधी कसरती पदक जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला.रत्नागिरी जिह्यातील पालीजवळच्या खेडय़ात राहणाऱ्या पूर्वा आणि प्राप्ती या किनारे भगिनींनी योगासन प्रकारात जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. मागील 12 वर्षांपासून अविरत मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी योगासनामध्ये यशाची मोठी उंची गाठली. आता 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची योगासनातील तपश्चर्या पदकाच्या माध्यमातून फळाला आली आहे. पूर्वाची योगासनातील सर्वोत्तम कामगिरी पाहून लहान बहीण प्राप्तीलाही प्रेरणा मिळाली. प्राथमिक शिक्षक असलेल्या आणि खो-खोचे पंच असलेल्या वडिलांनी या दोन्ही मुलींना मोठे पाठबळ दिले. त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवता आला. पनवेल येथील महाविद्यालयात इंजिनीअरिंगचे उच्च शिक्षण घेत असलेल्या पूर्वा आणि प्राप्ती यांनी अभ्यासाबरोबरच योगासनातील आपली साधना कायम ठेवली. पूर्वा ही इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षाला, तर प्राप्ती ही तिसऱ्या वर्षाला शिकत आहे.
www.konkantoday.com




