खेड तालुक्याला पावसाने झोडपले; जगबुडी आणि नारिंगी नदीतील पूर, देवणेनजीक पाळीव जनावरे नदीच्या पाण्यात अडकली

खेड : मंगळवार सायंकाळपासून पावसाने खेड तालुक्याला झोडपून काढल्याने खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. परिणामी खेड शहराला पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांची धाकधूक वाढली आहे. जगबुडी नदीच्या देवणे डोहानजीक पाच पाळीव जनावरे अडकून पडली आहेत. एकाबाजूला महाकाय मगरी आणि दुसऱ्या बाजूला खोल पाणी यामुळे अडकलेल्या जनावरांना सुरक्षित बाहेर काढणे अशक्यप्राय होऊन बसले आहे. जनावरांना वाचविण्यासाठी एनडीआरएफचे जवान शर्तीचे प्रयत्न करत आहेत मात्र जोराचा जोराचा पाऊस आणि नदीला आलेला पूर यामुळे पाळीव सायंकाळी ६ वाजेपर्यंत तीन जनावरांना काढण्यात यश आले होते. अजून दोन जनावरे पाण्यात अडकली असून त्यांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. खेड- दापोली मार्गावरील नारिंगी नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागली असून या नदीने आजुबाजुच्या शेतीसह खेड दापोली हा रास्ता देखील आपल्या कवेत घेतला आहे त्यामुळे खेड तालुक्याचा खाडीपट्टा, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांशी असलेला संपर्क तुटला आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला असे वाटत होते. त्यामुळे खेडच्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी देखील कमी झाली होती. मात्र मंगळवार सायंकाळी पुन्हा धो धो पावसाने सुरवात केली आणि या दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होवू लागली. मंगळवारी सायंकाळी सुरु झालेल्या पाऊस रात्रभर कोसळतच होता त्यामुळे जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळी ७. ७२ मीटर (जगबुडीची धोका पातळी ७ मीटर इतकी आहे) इतकी झाली आणि नदीकिनारी असलेल्या मटण मच्छी मार्केट येथून नदीचे पाणी शहराकडे उसळी घेऊ लागले. पाण्याची पातळी वाढल्याने खेडच्या व्यापाऱ्यांनी मंगळवारची पूर्ण रात्र जागून काढली.
पावसाचा जोर वाढू लागताच जगबुडी नदीकिरणारी वसलेल्या भोस्ते, अलसुरे, निळीक, या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नारिंगी नदीच्या किनारी असलेल्या गावांनाही धोक्याच्या सूचना देण्यात आल्या. खेडच्या प्रांताधिकारी श्रीमती राजेश्री मोरे, खेडच्या तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पोलीस अधिकारी आणि एनडीआरएफचे जवान पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खेड नगरपालीका आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सजग झाली आहे. खेड शहराला पुराचा वेढा पडलाच तर शहरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी आवश्यक असेलेली साधन सामुग्री, फायबर बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. २००५ आणि २००२१ च्या महापूराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. संततधार पावसाचा परिणाम एसटी सेवेच्या वेळापत्रकावरही झाला आहे. पावसामुळे ग्रामीण भागात गेलेल्या गाड्या उशीरा डेपोत येत असल्याने एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी ग्रामीण भागातून सकाळी बाजारात आलेले ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन विद्यार्थी शहरातच अडकून पडले आहेत. पावसाचा जोर वाढताच शहरातील शैक्षणिक संस्था चालकांनी आपापल्या शाळा लवकर सोडण्याचा निर्णय घेतला मात्र एसटीचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचे पाहावयास मिळाले. पाऊस जर आणखी काही तास असाच सुरु राहिला तर २०२१ च्या महापुराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोसाट्याचा वारा आणि संततधार पावसामुळे ग्रामिण भागात ठिकठीकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे ग्रामिण भागात सतत विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत. चांगल्या पावसामुळे ग्रामिण भागात भात लावणीची पन्नास टक्के कामे उरकली आहेत. तर नातूवाडी, खोपी -पिंपळवाडी, शिरवली, शेल्डी, कोंडीवली या धरण क्षेत्रात चांगली पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे चांगला पाणीसाठा होत आहे. जगबुडी आणि नारिंगी नदीच्या पाणी पातळीत क्षणाक्षणाला वाढ होत असल्याने बाजारपेठेत अद्याप पाणी भरले नसले तरी येथील नागिरकांच्या डोक्यावर पुराची टांगती तलवार कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button