भांबेडमध्ये वडिलांच्या बाराव्याच्या दिवशी उफाळला मालमत्तेवरून वाद; सावत्र आईला मारहाण
लांजा : वडिलांच्या बाराव्या विधीच्या दिवशी प्रॉपर्टीच्या वाटपावरून वाद होवून मुलांनीच सावत्र आईला मारहाण केल्याची घटना लांजा तालुक्यातील भांबेड लक्ष्मीनगर येथे घडली. या घटनेत सावत्र आईसह आणखी एक महिला जखमी झाली असून 2 मुलांसह सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहन राजेंद्र मिरजकर, धनश्री राजेंद्र मिरजकर, ॠषिकेश राजेंद्र मिरजकर (सर्व रा. भांबेड लक्ष्मीनगर, लांजा) अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद सावत्र आई स्वाती राजेंद्र मिरजकर (वय 50) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मिरजकर या नात्याने रोहन, ॠषिकेश यांच्या सावत्र आई आहेत, तर धनश्री (सून) यांच्या सासू आहेत. 11 जुलै रोजी मयत राजेंद्र मिरजकर यांचे 12 वे विधी होते. याच दिवशी सायंकाळी 5 वा. च्या सुमारास पॉपर्टीवरुन वाद उफाळला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. प्रॉपर्टीच्या वाटपाची मिटींग घेत असताना रोहन याने सावत्र आईला शिवीगाळ करत डोके भिंतीवर आपटले. यात स्वाती मिरजकर या जखमी झाल्या. याचवेळी सून धनश्री हिने हाताच्या ठोशाने पाठीवर मारहाण करुन दुखापत केली. हे भांडण सोडवण्यासाठी स्वाती यांची बहीण कल्पना शेटये तिथे आल्या असता रोहन याने त्यांचे केस ओढले तर धनश्री हिने मारहाण केली. तसेच सावत्र दोन भाऊ यांना रोहन, धनश्री, ॠषिकेश यांनी शिवीगाळ केली व तुमचा इथे काही संबंध नाही, आमचे घर आहे, असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली असे स्वाती मिरजकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिवाय गळयातील सोन्याची चेनही तुटून पडली असे त्यांनी म्हटले आहे.
स्वाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहन, धनश्री, ॠषिकेश मिरजकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.