पोलिस अधीक्षकांनी पाठ फिरवली अन् पुन्हा चिपळुणात वाहतूक कोंडी वाढू लागली

चिपळूण : शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायम आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक शुक्रवारी चिपळुणात येणार असल्याने शहरातील विविध चौक व वर्दळीच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रामुख्याने शहराचा प्रमुख व मध्यवर्ती असलेल्या शिवाजी चौकात एकाचवेळी सात ते आठ पोलिस कर्मचारी वाहतूक नियमन करीत होते. अचानकपणे एकाचवेळी या चौकात पोलिस कर्मचार्‍यांची उपस्थिती पाहून वाहनचालक देखील कुतूहलाने याबाबत चर्चा करीत होते. एरव्ही येथील शहरात कितीही वाहतूक कोंडी झाली तरी वाहतुकीचे नियमन करताना पोलिस मात्र दिसत नाहीत. पोलिस अधीक्षकांच्या दौर्‍यानंतर मात्र वाहतूक कोंडीचा प्रश्‍न पुन्हा भेडसावत आहे.
शिव नदीपासून स्टेट बँक परिसरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिक्षा व्यावसायिकांसह अन्य नागरिकांची वाहने वाहतुकीला अडथळा ठरतील, अशी उभी असतात. या भागात दोन्ही बाजूने रिक्षा उभ्या असतात. या शिवाय अजिंक्य आर्केडसमोर मोठ्या प्रमाणात पांढर्‍या पट्ट्याच्या बाहेर वाहने लावण्यात येतात. मात्र, गेल्या वर्ष-दीड वर्षात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी व कोंडी सोडविण्यासाठी चिपळूण पोलिस ठाण्यातून नेमलेले कर्मचारी आठ-आठ दिवस या ठिकाणी फिरकत देखील नाहीत. परिणामी, अर्धा-अर्धा तास वाहतूक कोेंडी निर्माण होऊन नागरिकांचे आपापसात वाद सुरू होतात. परंतु शुक्रवारी जिल्हा पोलिस अधीक्षक येणार असल्याने आठ-आठ दिवस कामाच्या ठिकाणी न फिरकणारे पोलिस कर्मचारी मात्र चौकात सकाळपासूनच कर्तव्य बजावताना दिसून आले. पोलिस अधीक्षकांनी पाठ फिरवल्यावर सध्या पुन्हा वाहतूक कोंडी सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button