कर्जाच्या परतफेडीसाठी होणार्या मानसिक छळाला कंटाळून विष पिऊन जीवन संपवले; राजापूर तालुक्यातील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल
राजापूर : कर्ज फेड करण्यासाठी एका फायनान्स कंपनीकडून तगादा लावल्याने राजापूर तालुक्यातील हसोळ तर्फे सौंदळ मुस्लिमवाडी येथील तरूण अजीम कादर नाईक यांनी विष घेऊन जीवन संपविले असल्याची घटना नुकतीच घडली. याबाबतची तकार त्यांच्या भाऊ रियाज नाईक यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावणार्या फायनान्स कंपनीच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर पोलिस ठाण्यातील तक्रारीनुसार, आजिम यांनी एप्रिल 2021 मध्ये जेसीबी खरेदी केला होता. त्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. कर्जाच्या हप्त्यापोटी महिन्याला 48 हजार 371 आकारले जात होते. सद्यस्थितीत काही काम नसल्याने तीन हप्ते थकलेले होते. त्यापैकी एक हप्ता महिनाभरापूर्वी भरला होता. तीन हप्ते भरण्याबाबत कोणतीही कायदेशीर नोटीस न देता किंवा कोणताही कायदेशीर मार्ग न अवलंबता उलट-सुलट बोलून कंपनीवाले मानसिक त्रास देत होते, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे थकीत हप्त्याची रक्कम भरण्याकरिता जबरदस्ती करीत होते. असेही तक्रारदारने नमूद केले आहे.
20 जून 2022 रोजी सोमवारी सकाळी 8 वाजता त्या फायनान्स कंपनीचे अधिकारी व आणखी काहीजण आमच्या घरी आले आणि भाऊ अजीम याला कारमधून घेऊन गेले. अजिमची चौकशी करून त्याला जेसीबी मशीन उभी असलेल्या नानीवडे गावी घेऊन गेले. त्यानंतर ते पुन्हा परत आले. दरम्यान अजिम मोठ्याने ओरडत असल्याचा आवाज आला म्हणून तक्रारदार व त्यांचे वडील तबेल्याजवळ आले. अजिमने विष प्यायले असल्याचे फायनान्सवाल्यांनी सांगितले. यावेळी शुध्दीत असलेला भाऊ अजिम यास विष का प्यायलास? असे विचारले असता फायनान्सवाल्यांच्या त्रासाला कंटाळून तबेल्यात ठेवलेले गवत मारायचे औषध प्यायलो असे सांगितल्याचे तकार अर्जात नमुद करण्यात आले आहे. याचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक एम.एल.मोळे करीत आहेत.