
वातावरणात बदल, आजारपणांत वाढ; गुहागर तालुक्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली
गुहागर : सध्या सुरू असलेल्या पावसामुळे आणि बदलेल्या वातावरणामुळे गुहागर तालुक्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांचे प्रमाण जास्त आहे. सर्दी, पडसे, ताप, खोकला आदींसारखे संसर्गजन्य रोग सध्या बळावल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. गुहागर तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेकडून साथीचे रोग रोखण्यासाठी आणि त्यांचा प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय अधिकार्यांपासून आरोग्य सेवकांपर्यंत सर्वच आरोग्य कर्मचारी जनतेला उत्तम सेवा पुरवित आहेत. तालुक्यातील शासकीय रूग्णालयात अनेक रुग्णांची रांगच रांग लागलेली दिसून येत आहे. शासकीय आरोग्य सेवक जनतेमध्ये असे साथीचे रोग रोखण्यासाठी कशाप्रकारे सावधानता बाळगावी हे प्रत्येक घरोघरी जाऊन सांगत आहेत.