आ. कदमांनंतर आ. उदय सामंत यांच्याही समर्थकांना धक्का; तुषार साळवी यांची पदावरून उचलबांगडी
रत्नागिरी : राज्यातील बंडखोरी व सत्तानाट्यानंतर बंडात सहभागी आमदारांचे समर्थन करणार्या पदाधिकार्यांवर शिवसेनेकडून कारवाई सुरु झाली आहे. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे उघड समर्थन करणार्या रत्नागिरी तालुका युवाधिकारी तुषार साळवी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वैभव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी खेड-दापोली मतदार संघातील आ. योगेश कदम यांच्या सहकार्यांना पदावरून हटवल्यानंतर आता रत्नागिरीचे आमदार व माजी मंत्री उदय सामंत यांना पाठिंबा देणार्यांवरही शिवसेनेने कारवाईचा बडगा उचलला आहे. आ. सामंत हे गुवाहाटीला गेल्यानंतर रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत रत्नागिरी युवा तालुकाधिकारी तुषार साळवी व उपजिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांनी उघड पाठिंबा व्यक्त केला होता. याबाबतचा अहवालही रत्नागिरीतून मुंबईत रवाना झाला होता. त्यानंतर रत्नागिरीतील पदाधिकार्यांचा नियुक्त्या शनिवारी जाहीर करण्यात आल्या. युवा तालुकाधिकारीपदी मिरजोळे येथील वैभव पाटील व उपजिल्हा युवा अधिकारीपदी पावस येथील हेमंत खातू यांची नियुक्ती शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आली आहे.