अमित ठाकरेंच्या दौर्याने मनसेत उत्साह
रत्नागिरी : मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी महासंवाद यात्रेचा नुकताच रत्नागिरी दौरा केला. या दौर्यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी नवीन नियुक्त्या झालेल्या पदाधिकार्यांबाबत आक्षेप घेतले. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्याचबरोबर कोणालाही न दुखावता संघटितपणे काम करण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन पदाधिकारी नियुक्त्या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन झाल्या आहेत. त्यामुळे रत्नागिरीचे नवीन तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्यासह इतर तालुकाध्यक्षांनी युवा नेते अमित ठाकरे यांच्या निर्देशानुसार पक्षीय संघटन बांधणी कार्याला प्रारंभ करण्याचे नियोजन सुरू केले आहे. दक्षिण जिल्हाध्यक्षांसह अनेक नवीन तालुकाध्यक्ष नियुक्त्या करण्यात आल्या. हा पदाधिकारी बदल करण्यापूर्वी संपर्क प्रमुख आणि जिल्हाभर दौरे करून संबंधितांच्या कार्य अहवालांची पाहणी केली. त्यानुसार संपर्क प्रमुखांनी नवीन नियुक्त्या केल्या. त्यामुळे काम करणार्या पदाधिकार्यांना कोणतीही अडचण नाही, याच विश्वासावर त्यांनी ठाकरेंच्या निर्देशानुसार काम सुरू केले आहे. रत्नागिरीतील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी नियोजन करत असल्याचे तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांनी सांगितले. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर आणि तालुक्याचे संपर्क कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी लवकरच सुरू केले जाणार आहे.