रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील संशयिताच्या पोलिस कोठडीत वाढ
रत्नागिरी: रत्नागिरीतील रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील संशयिताच्या पोलिस कोठडीत 11 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रवींद्र सिरोमन पंचम ( रा. मध्यप्रदेश ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. आशिष संजय किडये ( 29, रा. धनजीनाका, रत्नागिरी ) यांनी तक्रार दाखल केली होती. महिनाभरापूर्वी म्हणजे 11 जून रोजी पर्यटक बनून आलेल्या तिघांनी गणपतीपुळे येथे जायचे असल्याचे सांगून आशिष याला गणपतीपुळे येथे नेले. दरम्यान संबंधित पर्यटक हे रत्नागिरीच्या दिशेने परत येत असताना त्यांनी आशिषला प्रसाद म्हणून खाण्यास लाडू दिला होता. त्या लाडूतून गुंगीचे औषध देऊन हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम, एक तोळ्याची सोन्याची चेन असा ऐवज लुटला होता. या प्रकरणी रवींद्र पंचम याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची पुन्हा पोलीस कोठडी वाढवली आहे. 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.