सायकलचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात; दापोलीत दहावीच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोली : शहरातील एका शाळकरी मुलाचे सायकलचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात दि. 7 जुलै रोजी सायंकाळी अपघाती निधन झाले. दापोली शहराजवळील गिम्हवणे आझादवाडी येथील आर्यन विनोद गौरत हा इयत्ता दहावीत होता. शहरातील लोकमान्य हायस्कूलमध्ये तो शिक्षण घेत होता. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे सायकल घेऊन घरी जाण्यासाठी निघाला असता सायकलचे ब्रेक उतारात निकामी झाले आणि अपघात झाला. यावेळी तत्काळ त्याच्या मित्रांनी त्याला शाळेत पुन्हा नेले. शिक्षकांनी तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना सायंकाळी साडेसात वाजता त्याची प्राणज्योत मालवली. गिम्हवणे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 8 जुलै रोजी शुक्रवारी सकाळी आर्यनवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असे कुटुंब आहे. या घटनेची नोंद दापोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.