
कर्ज माफीसाठी आंबा बागायतदारांचे ३० डिसेंबरला धरणे आंदोलन
कोकणातील आंबा बागायतदार नैसर्गिक संकटामुळे आर्थिक विवंचनेत आहे. शासनाकडून वारंवार आश्वासने दिली जात आहे. मात्र प्रत्यक्षात शासनाकडून कोणतीही मदत केली जात नाही. कर्ज माफीची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. प्रलंबित मागण्यांबाबत आंबा उत्पादक संघामार्फत दि. ३० डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
गेली आठ ते दहा वर्षे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्यांना खराब हवामान, अवेळी पाऊस पडणे, वादळीवारे, कोरोना संकट या कारणांमुळे मोठा आर्थिक फटका बसत आहे. या बाबतची निवेदने शासनाला मंत्री, स्थानिक आमदारांना वेळोवेळी दिलेली आहेत. परंतु शासन स्तरावर अद्याप दखल घेतली जात नाही. शेतकरी दिवसेंदिवस अधिक आर्थिक अडचणीत येत आहेत.
आमच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने शासनाचे खास करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे लक्ष वेधण्यासाठी दि. ३० डिसेंबर रोजी ११ ते ४ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा आंबा उत्पादक संघाने दिला आहे. या आंदोलनात कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी प्रमुख उपस्थितीत सहभागी होणार आहेत.
शासनाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री व मंत्रिमंडळ यांच्या समवेत आंबा बागायतदारांची बैठक घेवून थकित कर्जदारांची मुक्तता करावी, असे न झाल्यास दि. २६ जानेवारीला कोकणातील आंबा बागायतदार उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघाने दिला आहे. www.konkantoday.com