
एसटीच्या टायर तुटवड्याची समस्या मार्गी : विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत टायरचा मोठा तुटवडा जाणवत होता. टीआरपी एस.टी. कार्यशाळेत स्वतंत्र टायर प्लांट कार्यान्वित होता मात्र या ठिकाणी महामंडळाकडून जो कच्चा माल उपलब्ध होत होता, तो काही महिन्यांपासून होत नव्हता. महामंडळाला जी कंपनी हा माल देत होती त्या कंपनीने हा पुरवठा पूर्णत: बंद केला होता. आता हा पुरवठा सुरळीत झाला असून रत्नागिरी विभागीय कार्यशाळेतील टायर प्लांट सुरु करण्यात आला आहे.
यापुढे टायरचा तुटवडा जाणवणार नाही, अशी माहिती विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.
कोरोना काळापासून एसटीच्या मागे एकामागोमाग एक संकट उभे राहिले. तरीदेखील या संकटांवर एसटीने चांगली मात केली. टायर नसल्याने बसेस बंद ठेवण्याची वेळही राज्य परिवहनच्या रत्नागिरी विभागावर आली. यापुढे टायर समस्या उद्भवणार नाही, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे. रत्नागिरी विभागातील टायर प्लांटला जो कच्चा माल पुरवठा होत होता तो आता पुन्हा सुरु झाला असून त्यामुळे हे टायर प्लांट नियमितपणे सुरु राहणार आहे.