
सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी यांचे निधन
धामणसे गावातील सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी ( बीडीओ) श्री. मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी यांचे सोमवार दिनांक ४ जुलै रोजी वार्धक्याने दुःखद निधन झाले. मुत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. अण्णा कुळकर्णी या नावाने ते सर्व परिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणातून खानदेशात जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. कामाची आवड आणि शिकण्याची ओढ असल्याने खात्यांतर्गत परीक्षा देत ते बीडीओ पदापर्यंत पोहोचले. तळमळीने काम करणाऱ्या अण्णा कुळकर्णींनी शासनाच्या जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवत अनेक उद्दिष्टे पूर्ण केल्याबद्दल शासनातर्फे त्यांना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले होते.
अण्णांना उपजतच असलेले कायद्याचे ज्ञान आणि अनुभव व प्रशासनावर असलेली पकड लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री भाई सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेनंतर त्यांना ओरोसचे बीडीओ म्हणून नियुक्त केले. तेथे काम करताना सिंधुदुर्गाच्या विकासात एक शासकीय अधिकारी म्हणून उत्तम सहभाग नोंदविला. रत्नागिरीचे बीडीओ म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या धामणसे गावाच्या विकासाकडे लक्ष दिले. गावात हायस्कूल सुरु व्हावे यासाठी त्यांनी मेहनत घेतली. धामणसे माध्यमिक उच्च शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करत त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हायस्कुल सुरु केले.
गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. सोमवार ४ जुलै रोजी सायंकाळी ६.२० मिनीटांनी रत्नागिरी निवासस्थानी अखेरीचा श्वास घेतला.
पुरोगामी विचारांच्या अण्णा कुळकर्णींनी यांनी नेत्रदान केले.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली, सून, जावई , नातवंडे असा विशाल परिवार आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डाॅक्टर मिलिंद कुळकर्णी यांचे ते वडील होत.
www.konkantoday.com